नेवासा प्रतिनिधी-सुधीर चव्हाण
नेवासा- येथे कायदेविषयक जनजागृती शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
आपल्या न्याय हक्कांसाठी कायदे विषयक ज्ञान प्रत्येक नागरीकाला कळणे ही काळाची गरज-न्यायाधीश
नेवासा नगरपंचायतमध्ये कामगारांच्या न्याय हक्काविषयी न्यायाधीश महोदयांच्या उपस्थितीत जिल्हा व नेवासा तालुका न्याय विधी समिती,नेवासा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक प्रबोधनात्मक शिबीर घेण्यात आले. कामगारांचे हक्क व शासनाच्या विविध योजना याबाबत शिबिरात जनजागृती करण्यात आली.आपल्या न्याय हक्कांसाठी कायदे विषयक ज्ञान प्रत्येक नागरीकाला कळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी.बी.जाधव यांनी यावेळी बोलतांना केले.
नेवासा नगरपंचायतच्या सभागृहात झालेल्या शिबीराच्या अध्यक्षस्थानी नेवासा न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी बी जाधव हे होते तर न्यायाधीश ए.एम. हुसेन, नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दिघे, इंजिनियर सुनीलराव वाघ, नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी मेजर रामदास म्हस्के, वकील संघाचे अध्यक्ष अँड.बन्सीभाऊ सातपूते,अँड. जावेद ईनामदार,अँड.रमेश पाठे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कायदेविषयक जनजागृती शिबीर प्रसंगी नेवासा वकील संघाचे अध्यक्ष अँड. बन्सीभाऊ सातपूते यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत कायदे व त्याची अंमलबजावणी कशी करावी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. इंजिनियर सुनीलराव वाघ यांनी प्रास्ताविक करत कायद्याचे ज्ञान आपल्या न्याय हक्कासाठी सर्वांना कळावे तसेच अनेक कायदे झाले आहे मात्र त्याचे ज्ञान नसल्याने त्याचा लाभ नागरिकांना घेता येत नाही म्हणून न्यायाधीश महोदयांच्या उपस्थितीत होणारे कायदेविषयक जनजागृती शिबीर काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अँड.पी आर माकोणे यांनी बांधकाम व मजुरांचे मुद्दे विषद करत त्यानुसार आपल्याला न्याय कसा मागता येईल याविषयी मार्गदर्शन केले.गटविकास अधिकारी संजय दिघे यांनी केंद्र व राज्याच्या योजनांचे फायदे विषयावर मार्गदर्शन करत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.युवा विधी तज्ञ अँड.मयूर वाखुरे यांनी बांधकाम व शेतमजूरांच्या इतर समस्या व कायदेशीर हक्क,सहन्यायाधीश ए एम हुसेन यांनी गरीबी निर्मूलन योजनांची प्रभावी अंमलबजावणी योजना २०१५ याविषयी मार्गदर्शन करत उपस्थित कामगारांमध्ये जनजागृती केली.
यावेळी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश २ श्री जी.बी. जाधव यांनी पीडित नुकसान भरपाई योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करत या अंमलबजावणीसाठी कायदेशीर साक्षरता शिबिरे काळाची गरज असल्याचे सांगितले.यावेळी नगरपंचायतचे प्रशासकीय अधिकारी मेजर रामदास म्हस्के यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सदर शिबीर प्रसंगी प्रेस क्लबचे सुधीर चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते मुसाभाई बागवान, कामगार प्रतिनिधी प्रकाश चव्हाण, न्यायालयाचे कर्मचारी बगळे यांच्यासह नगरपंचायतचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.अँड.रमेश पाठे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर अँड.संदीप कोतकर यांनी उपस्थित कामगार व मान्यवरांचे आभार मानले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा