नेवासा प्रतिनिधी- सुधीर चव्हाण
नेवासा- पौष रविवारच्या पाच यात्रा उत्सवाची तालुक्यातील श्री क्षेत्र बहिरवाडी येथे उत्साहात सांगता
“नाथांचे चांगभल”चा गजर करत पाच ही रविवारी लाखो भाविकांनी घेतले श्री कालभैरवनाथांचे दर्शन
नेवासा तालुक्यातील जागृत असलेल्या श्री क्षेत्र बहिरवाडी येथे पौष महिन्यातील पाच पौष रविवारच्या यात्रा उत्सवाची उत्साहपूर्ण व भक्तीपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. “नाथांच्या नावानं चांगभल”असा गजर करत या कालावधीत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
पौष महिन्यात आलेल्या पाच ही रविवार हे नवसाचे असल्याने परंपरेनुसार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याने मंदिर परिसरात पाच ही रविवारी विविध दुकाने थाटण्यात आल्याने येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.यात्रा कालावधीत श्री क्षेत्र देवगडचे महंत व श्री कालभैरवनाथ देवस्थानचे मार्गदर्शक गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी,देवगडचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, मध्यमेश्वर देवस्थानचे महंत ऋषिनाथजी महाराज, गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या मातोश्री श्रीमती सरुबाई पाटील,महंत गणेशानंद महाराज,महंत दीपकनाथ महाराज यांनी भेटी दिल्या.या सर्व संत महंतांचे देवस्थान विश्वस्त कमिटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.
नेवासा तालुक्यातील बहिरवाडी हे क्षेत्र श्री कालभैरव नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे.श्री क्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली व श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने या क्षेत्राचा कायापालट होत आहे. पौष महिन्यात येणारे रविवार हे नवसाचे मानले जात असल्याने पाच ही पौष रविवारी लाखाच्या वर भाविकांनी येथे हजेरी लावून जागृत असलेल्या श्री कालभैरवनाथांचे दर्शन घेतले
पूर्वी येथे बोकड व कोंबडयांचा बळी येथे दिला जायचा मात्र भगवंत भावाचा भुकेला असून मुक्या जीवाला बळी न देता श्री कालभैरवनाथांना आवडता डाळ रोडग्याचा नैवैद्य देवाला अर्पण करून नवसपूर्ती करा असे आवाहन करून गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी प्रबोधन व जनजागृती केल्यानंतर येथे बळी देण्याची प्रथा बंद करण्यात आली.आज भाविक येथे येऊन श्रद्धेने तीन दगडांची चूल करून गोवरीवर रोडगा भाजून श्री कालभैरवनाथांना नैवैद्य अर्पण करतात.
गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबांच्या प्रेरणेने येथे विविध विकास कामे मार्गी लागत आहे तसेच त्यांनी केलेल्या आवाहनानुसार भक्तांच्या दिलेल्या आर्थिक योगदानातून सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चाचे भव्य मंदिर प्रवरा नदीच्या मध्यधारेवर उभारण्यात आलेले आहे.दर्शनासाठी काळा पाषाण असलेली मूर्ती बसविण्यात आली असून याच मंदिराच्या पाण्याखाली श्री कालभैरवनाथांची पूर्वीची मूर्ती आहे.
पौष महिन्यात आलेल्या तिसऱ्या रविवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.सर्वांना रांगेत दर्शन घेता यावे म्हणून तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र सेवेकरी बनून स्वयंसेवकाची भूमिका पार पाडली.तसेच ग्रामस्थ व विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी देखील सेवेच्या माध्यमातून योगदान दिले.पौष रविवार निमित्त मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी रीघ लागली होती तर मंदिर प्रांगणात विविध स्टॉल यावेळी थाटण्यात आले होते. आलेल्या भाविकांना गूळ शिरा लाफशी चे वाटप सेवेकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा