नेवासा प्रतिनिधी- सुधीर चव्हाण
नेवासा- गंगापुर तालुक्यातील सिध्दपूर येथे आयोजित संतपूजन व कीर्तन सोहळा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जीवनातील मोठे धन असलेला परमार्थ वाढविण्यासाठी प्रयत्न करा-वाणीभुषण महंत उद्धवजी महाराज मंडलिक.
गंगापूर तालुक्यातील सिध्दपूर येथे सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख वाणी भूषण गुरुवर्य ह.भ.प.उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या आयोजित कीर्तन सोहळा व संतपूजन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.परमार्थ हेच मनुष्य जीवनातील मोठे धन असून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी परमार्थ वाढीस लावण्याचा प्रयत्न करा असे आवाहन महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी सिद्धपुर येथे झालेल्या कीर्तन सोहळा व संतपूजन कार्यक्रम प्रसंगी संयोजक रामराव सातपूते,अशोक सातपूते, एकनाथ सातपूते,शेकनाथ सातपूते,गायनाचार्य बाबासाहेब महाराज सातपूते यांच्या हस्ते ह.भ.प.उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे संतपूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित कीर्तनकार,प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, वादक,वारकरी सेवेकरी यांचा श्रीफळ वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना ह.भ.प.उद्धवजी महाराज मंडलिक म्हणाले
की संत सेवेकरी जीवन जगणाऱ्या स्वर्गीय सौ.भीमबाई सातपूते यांनी आपुलकीने परमार्थ केला,देवगडची पंढरीची वारी त्या नित्यनेमाने करत त्यांच्या सुमारे पाचशे ओव्या हया मुखवदगत होत्या त्यांच्याच संस्कारामुळे सर्व परिवाराने देखील परमार्थ जपण्यासाठी काम केले,सिद्धपुर हे गाव देखील परमार्थाची गोडी असलेले गाव असल्याचे गौरवोदगार त्यांनी यावेळी बोलताना काढले.
देव देश धर्म व संतविचार ज्याला कळतो त्याचे जीवन हे कृतार्थ होत असते,बेभान होणे हे आज्ञानापेक्षा घातक असून जबाबदारीचे भान ठेऊन कृतार्थ जीवन जगण्यासाठी प्रयत्न करा,परमार्थ हे मोठे धन असून जेवढे वाटालं तेवढे ते वाढत जाते,परमार्थ करतांना परमात्म्याची मोठी शक्ती आपल्या पाठीशी असते त्यामुळे जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ करा,काळावर विजय मिळविण्यासाठी परमार्थाच्या माध्यमातून जीव शिव ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा असे आवाहन ह.भ.प.महंत उध्दवजी महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कीर्तन सोहळयास ह.भ.प.विजय महाराज खेडकर,रामनाथ महाराज पवार,मृदुंगाचार्य गिरीजीनाथ महाराज पवार,विजय महाराज पवार,देविदास महाराज,अशोक महाराज निरफळ, नंदू महाराज भगत, गोरक्षनाथ महाराज मनाळ, गंगापूरचे नगराध्यक्ष प्रदीप भैय्या पाटील, वाल्मिक शिरसाठ, मधुकर वालतुरे, माऊली महाराज फटांगरे, मधुकर मनाळ,नेवासा येथील शिवसेनेचे अंबादास लष्करे, देवगडचे उपसरपंच भीमाशंकर वरखडे उपस्थित होते.गायनाचार्य गिरीजीनाथ महाराज जाधव यांनी यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सोहळा संयोजक बाबासाहेब महाराज सातपूते यांनी उपस्थित संत महंत सेवेकरी वारकरी ग्रामस्थ यांचे आभार मानले.उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा